पुणे: वेगवेगळ्या कंपनीच्या पॉलिसींबाबत माहिती देऊन फक्त एक हफ्ता भरावा लागेल आणि पॉलिसीची सगळी रक्कम तीन वर्षांनी परत मिळेल असे सांगून एकाची तब्बल १ कोटी ५६ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना कर्वेनगर परिसरात घडली आहे.
वैजू मकरंद वरुडकर (वय ६४, रा. कर्वेनगर) यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी करण कपूर याने वारुडकर यांना फोन करून वेगवेगळ्या पॉलिसींची माहिती दिली आणि वरुडकर यांना पॉलिसी काढल्यास फायदा होईल असे सांगितले. फक्त एकच हफ्ता भरावा लागेल आणि पॉलिसीची रक्कम तीन वर्षांनी परत मिळेल असे सांगून वरुडकर यांच्याकडून वेगवेगळ्या पॉलिसी काढून घेतल्या. सन २०११/२०१२ मध्ये सुरुवातीला एकूण ८ लाख ३० हजार रुपये भरून घेतले. तसेच पॉलिसीचे पैसे परत मिळवून देण्याचे कारण देत वरुडकर यांच्याकडून वेळोवेळी फोन करून २०११ पासून ते आजपर्यंत आरोपी कारण कपूर याने एकूण १ कोटी ५६ लाख २६ हजार ३१० रुपये उकळले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डफळ हे करत आहेत.