पुणे : टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या इसमालाच केदारनाथ यात्रेसाठी कमी किमतीत विमानाची तिकीट काढून देतो असे सांगत दुसऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाने ३ लाख ८७ हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी फसवणूक झालेल्या इसमाने दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत दामले असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. दामलेची आर्या हॉलिडेज ही ट्रॅव्हल्स कंपनी आहे. त्याने १४ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या कालावधीत तक्रारदार पार्थ टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक रोहीत आबासो कोतवाल (३०, रा. पद्मावती क्लासेस, मांजरी) यांना ४० सदस्यांची केदारनाथ यात्रेला जाण्यासाठी कमी किमतीत पुणे ते दिल्ली विमान तिकीटे काढून देतो असे सांगितले. कोतवाल यांनी यासाठी दामलेला १ लाख ६१ हजार ८०० रुपये देखील दिले. मात्र तिकीटांची किंमत वाढलेली असून त्यासाठी आणखीन २ लाख २८ हजार २०० रुपये दामले याने राहीत कोतवाल यांना मागितले. असे ३ लाख ८७ हजार ६८० रुपये देऊनही विमानाची तिकीटे दिली नाहीत.
तसेच कोतवाल यांनी दिलेले पैसे देखील परत केले नाहीत, अखेर रोहीत कोतवाल यांनी हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांकडे फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गांधले करत आहेत.