पुणे : हिंजेवाडी परिसरात बार सुरू करण्यासाठी ४ कोटी रुपयांचे कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने एका २९ वर्षीय तरूणाची दोघांनी ८ लाख ४५ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पियुष अरुण राजूकर (२९, रा. डी. पी. रोड, कोथरूड) याने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार तामाब्रता रॉय आणि सामाब्रता रॉय (रा. दोघेही रा. डी. पी. रोड, कोथरूड) या दोन भावांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी २०२१ ते २० जुलै २०२३ दरम्यान घडली असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि आरोपी भावंडे हे एकाच सोसायटीत राहायला आहेत. फिर्यादी पियुष हा ब्रोकरचे काम करत होता. पियुषची आरोपींशी ओळख झाल्यानंतर त्यांनी हिंजेवाडी फेज १ मध्ये बार अँड रेस्टॉरंटसाठी ४ कोटींचे लोन मिळवून देतो असे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे घेऊन ८ लाख ४५ हजारांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तानाजी पांढरे करत आहेत.