पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने मेडिकल कॉलेज सुरु होण्यापूर्वीच या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एजंटांनी फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर नाशिकमधील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून राज्यातील १३ जणांची तब्बल अडीच कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चंद्रशेखर देशमुख, राजेंद्र कुशावह, पारस शर्मा, व त्यांचे साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अहमदनगरमधील ४७ वर्षाच्या नागरिकाने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येत आहे. त्यासाठी वार्षिक ७ लाख रुपये फी आहे. हे कॉलेज येत्या जूनपासून सुरु होणार आहे. तेथील ७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. आणखी २० जागा भरण्यात येणार आहे. चंद्रशेखर देशमुख याने विमाननगर येथे शिक्षा सेवा इंडिया याने संस्था सुरु केली. फिर्यादी यांचा मुलगा जयदिप याला डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षणाकरीता व्यवस्थापक कोठ्यातून प्रवेश घेऊन देतो, असे सांगून त्याच्या नावाचे बनावट अलॉटमेंट लेटर व सिलेक्शन लेटर तयार केले. फिर्यादी यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. प्रवेशासाठी चेक व रोख ३० लाख ७२ हजार रुपये घेतले. मात्र, मुलाला प्रवेश मिळवून दिला नाही. अशा प्रकारे त्यांनी सांगोला, पंढरपूर, पुणे जळगाव अशा विविध ठिकाणच्या आणखी १२ जणांना प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली २ कोटी ५३ लाख १७ हजार ५५९ रुपयांची फसवणूक केली आहे.
चंद्रशेखर देशमुख हा शिक्षा सेवा इंडियाचा कोणाला व्यवस्थापकीय संचालक सांगायचा तर काही जणांना राजेंद्र कुशावह हा आपण संचालक असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करुन फसवणूक करीत होते. यातील काही जणांना त्यांनी पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. काही जणांकडून ३५ लाख, कोणाकडून १६ लाख, २० लाख, २५ लाख अशी वेगवेगळी रक्कम या चोरट्यांनी घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे तपास करीत आहेत.