पुणे : मालकाच्या नावाने बनावट ई-मेलद्वारे पैसे पाठविण्यास सांगून एका कंपनीची ४ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बोपोडी येथील एका ३६ वर्षांच्या नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २१ डिसेंबर २०२१ रोजी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बोपोडी येथील एका कंपनीत संचालक पदावर काम करतात. त्यांच्या कंपनीचे मालक हे अमेरिकेत वास्तव्यास आहेत. कंपनीचे दैनंदिन कामकाज त्यांना फिर्यादी ई-मेलद्वारे कळवितात. दरम्यान आरोपीने याच संधीचा फायदा घेत फिर्यादी यांच्या मालकाच्या नावाचा वापर करून बनावट ई-मेल आयडी तयार केला. पुढे त्याच मेलचा वापर करून आरटीजीएसने एका व्यक्तीच्या बँक खात्यावर ४ लाख ७० हजार रुपये पाठविण्यास सांगितले. फिर्यादींना मालकाच्या नावाचा मेल आल्याने त्यांनीच हे पैसे पाठवण्यास सांगितल्याचे वाटले.
त्यानुसार त्यांनी त्या व्यक्तीच्या नावावर पैसे पाठवले. मात्र, जेव्हा मालकांसोबत त्यांची चर्चा झाली तेव्हा त्यांनी असे पैसे कोणाला पाठवण्यास सांगितले नसल्याचे म्हटले. त्यावेळी फसवणूक झाल्याचे फिर्यादींना लक्षात आले. याबाबत त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.