चाकण (पुणे) : बँकेकडे तारण असलेल्या जमिनीचे खोटे बक्षीस पत्र बनवून एका व्यावसायिकाची तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना दि. १५ जून २०१९ ते नोव्हेंबर २०२३ कालावधीत खराबवाडी (ता. खेड ) येथे घडली असल्याची माहिती म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.
याप्रकरणी मनोहर मोनिराम नायडू (वय ६३ वर्षे, रा.भोसरी, पुणे ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अमृता श्याम केसवड (वय ३९ वर्षे, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे ) व त्याची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराबवाडी (ता.खेड) येथील जमिनीचा संबंधितांनी फिर्यादी नायडू यांच्याशी व्यवहार ठरवला. संबंधित जमीन ही ९२ लाख रुपयांचे असून, ती ८२ लाख रुपयाला देत असल्याचे सांगत यासाठी फिर्यादी यांच्याकडून नऊ लाख रुपये घेण्यात आले. मात्र संबंधित जमीन ही बँकेकडे तारण असल्याची कोणतीही माहिती संबंधित दाम्पत्याने फिर्यादी यांना दिली नाही. तसेच विक्रीचा व्यवहार सुरू असताना आरोपीने पत्नीच्या संमतीने आपल्या मुलाच्या नावे त्या जमिनीचे बनावट बक्षीस पत्र बनवून घेतले. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच फिर्यादी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाळुंगे पोलिस पुढील तपास करत आहेत.