पुणे : शेअर मार्केट आणि ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करत तब्बल १२५ कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेची फसवणूक करणाऱ्या नवरा-बायकोविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले. अविनाश राठोड आणि विशाखा राठोड, असे आरोपी बंटी-बबलीचे नाव आहे. या दोघांनी ६०० पेक्षा अधिक लोकांची फसवणूक केली आहे.
राठोड दाम्पत्य सध्या दुबईत असून, पुणेपोलिसांकडून त्यांना पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात येत आहे. या फसवणुकीप्रकरणी २० एप्रिल २०२३ रोजी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात डॉ. जगदीश शंकरराव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपासादरम्यान १० जणांची १६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले होते. तपासादरम्यान याप्रकरणात अनेक गुंतवणूकदार असून, फसवणुकीची रक्कम ही कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे समोर आले.
आतापर्यंत पोलिसांनी ५१ गुंतवणूकदारांचे जबाब घेतले असून, फसवणुकीची रक्कम १२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसेच, ६०० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यतादेखील पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. आरोपींनी एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी नावाच्या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना शेअर बाजारात दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. भरघोस नफ्याच्या आशेने लोकांनी कोट्यवधी रुपये गुंतवले; पण पैसे परत मागण्यास सुरुवात झाल्यावर आरोपी फरार झाले.
याप्रकरणी पोलिसांनी आता ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इंटरपोल आणि अन्य एजन्सींना माहिती मिळावी, यासाठी ही नोटीस यवतमाळमध्ये जारी करण्यात येणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीयस्तरावर आरोपींना अटक करता यावी, यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचीही तयारी सुरू आहे. नोटीस देऊनही ठोस माहिती मिळाली नाही, तर पुणे पोलिस गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढतील. याप्रकरणी लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.