पिंपरी : पेटीएम अपडेट करण्याच्या मेसेज करून एक लिंक पाठवली. या लिंकद्वारे पेटीएम वापरकर्त्याच्या बँक खात्यातील ४९ हजार रुपये काढून घेण्यात आले. ही घटना १९ सप्टेंबर २०२२ रोजी चऱ्होली येथे घडली. या प्रकरणी सुरेश रावजी म्हसे (वय ५७, रा. चऱ्होली) यांनी रविवारी (दि. ८) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मेसेज करणाऱ्या अज्ञात मोबाईलधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज पाठवून पेटीएम बँकेची केवायसी अपडेट करा, असा संदेश आला. तसेच एक लिंक देखील पाठविण्यात आली. फिर्यादीने लिंक ओपन केली असता पेटीएमच ॲप उघडले. फिर्यादीने ॲपमध्ये आरोपीने केलेल्या सूचनेप्रमाणे ओटीपी टाकला. मात्र, त्यानंतर फिर्यादीच्या पेटीएम बँक खात्यातून टप्याटप्याने ४९ हजार रुपये आरोपीने काढून घेतले.