पुणे : ओशो इंटरनँशनल फाउंडेशन ट्रस्टचे विश्वस्त आणि व्यवस्थापकीय टीमच्या काही सदस्यांच्या संगनमताने कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमाच्या उपक्रमासाठी धर्मादाय आयुक्त आणि परकीय चलन विभागाच्या परवानगीविना भारताबाहेर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले जात असल्याचा आरोप ओशो फ्रेंड्स फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त योगेश ठक्कर ऊर्फ स्वामी प्रेमगीत आणि आरती राझडन यांनी केला आहे. या ट्रस्टमधील गैरव्यवहाराबाबत ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या विश्वस्तांविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
ठक्कर म्हणाले, आश्रमाच्या मालमत्तेमधील ३७२ चौरस फूट क्षेत्राचा एक भाग पावणेतीन कोटी रुपयांना विकण्यात आला असून, ही रक्कम ओशो इंटरनॅशनल डिजिटल मीडिया लिमिटेडच्या हाँगकाँग येथील बँक ऑफ चायनाच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात आश्रमात केवळ दहा माणसे वास्तव्यास होती. त्यांचा खर्च 3 कोटी ६३ लाख रुपये दाखविण्यात आला आहे. गैरव्यवहारांचा योग्य तपास केल्यास किमान एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघड होऊ शकेल. यासंदर्भात कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये ओशो फ्रेंडस फौंडेशनतर्फे तक्रार अर्ज दाखल केला आहे. परंतु या तक्रारीवर पोलिसांनी अद्यापपर्यंत एफआयआरची नोंद केलेली नाही. या गैरव्यवहाराच्या चौकशीबाबत कायदेशीररित्या कार्यवाहीची आमची मागणी आहे.
ओशो इंटरनँशनल फाउंडेशन ट्रस्टचे विश्वस्त आश्रमात ओशोंची समाधी नाही असे म्हणत आहेत. परंतु, आमच्या उपस्थितीतच इथे समाधी निर्मित करण्यात आली आहे. तरीही शिष्यांना समाधीपर्यंत जाण्यास मज्जाव केला जातआहे. तसेच आश्रमातील प्रवेश शुल्क वाढवल्यामुळे सामान्य नागरिक प्रवेश करू शकत नाहीत. आश्रमाचे पैसे खासगी कंपनीमध्ये ट्रान्सफर केले जात आहेत असेही ते म्हणाले.