खेड शिवापुर : पुणे - सातारा रस्त्यावरून प्रवास करताना खेड-शिवापूर येथील टोल प्रत्येकजण भरत असतो. पण या टोलवर वाहनचालकांना बनावट टोल पावत्या देऊन पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अभिजित बाबर हे सातारा रस्त्यावर प्रवास करत असताना त्यानी आणेवाडी टोल नाक्यावर व खेड शिवापूर टोल नाक्यावर रितसर टोल फाडला. मात्र, बारकाईने पाहिले असता आणेवाडी टोल नाका व खेड शिवापूर टोल नाका या मधील टोलपावत्यामध्ये त्यांना फरक दिसून आला. याबाबतची तक्रार त्यांनी पोलीस विभागाकडे केली. स्थानिक गुन्हे शाखेने बाबर यांच्यासह संबंधित टोलनाक्यांवर ती जाऊन पावती संदर्भात खातरजमा केली. या पावत्या बनावट असल्याचे उघड झाले. या संदर्भात अभिजित बाबर यांनी राजगड पोलीसांत तक्रार दाखल केली.
राजगड पोलिसांनी सुदेश प्रकाश गंगावणे वय 25 वर्षे रा. वाई धोम कॉलनी), अक्षय तानाजी सणस (वय 22 वर्षे रा. वाई नागेवाडी), शुभम सिताराम डोलारे (वय 19 वर्षे रा. जनता वसाहत,पुणे), साई लादूराम सुतार( वय 25 वर्षे रा. दत्तनगर, कात्रज), हेमंत भाटे , दादा दळवी, सतीश मरगजे व त्यांचे इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात 'रिलायन्स इन्फ्रा'चे व्यवस्थापक अमित भाटिया यांच्याकडे माहिती साठी संपर्क केला असता होऊ शकला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड चे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम हे करत आहेत.
.......
टोल नाक्यावरील तोतयागिरी या रूपाने उघड झाली आहे. वर्षानुवर्षे अशाच प्रकारे सर्वसामान्यांची व शासनाची लुबाडणूक या टोलच्या माध्यमातून होत असून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा झोल या टोल नाक्यावर झालेला आहे, याची सखोल चौकशी व्हावी व हा टोलनाका त्वरित बंद करावा अशी मागणी आम्ही करतो.
-दिलीप बाठे , समन्वयक, शिवापूर टोल नाका हटाव कृती समिती.