प्रसाद कानडे
पुणे :पुणेरेल्वे स्थानकांवरील अधिकृत स्टॉलधारक प्रवाशांना तुमच्या तिकिटात ‘खाना’ (खाद्यपदार्थ) असल्याचे सांगून त्यांना ते जबरदस्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. संबंधित प्रवाशांनी त्यास विरोध केला तर प्रसंगी हातघाईवर प्रकरणे येत आहेत. अनेक प्रवाशांनी या संदर्भात तक्रार दिल्यानंतरही वाणिज्य व आरपीएफ विभाग त्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे स्थानकावरील स्टॉलधारकांची दादागिरी वाढत असून सामान्य प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे.
पुणे स्थानकांवर गेल्या काही दिवसांत अशा प्रकारांत वाढ झाली आहे. पुणे स्थानकावरून दानापूर, गोरखपूर, कोलकाता अशा लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवाशांच्या बाबतीत हे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. या गाड्यांमधून प्रामुख्याने अशिक्षित किंवा कामगारवर्ग प्रवास जास्त प्रमाणात करत असल्याने त्यांची फसवणूक करणे सोपे जात आहे. रेल्वे प्रशासन याकडे सोईस्कर डोळेझाक करीत असल्याचा आरोप सूत्रांनी केला.
हे कसे करतात प्रवाशांची फसवणूक
अनधिकृत स्टॉलधारकांचे कर्मचारी लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यात शिरतात. कमी शिकलेले, कामगार, मजूर असे प्रवासी हेरून त्यांच्याकडून तिकिटाची मागणी केली जाते. तिकीट पाहून त्यावर ‘खाना’चा समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तुम्हाला आमच्याकडून जेवण घ्यावेच लागेल, अशी दटावणी करुन एका वेळचे जेवण त्यांना शंभर किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांना विकत घेण्यास भाग पाडले जाते.
स्टॉलधारकांना नाही परवानगी
स्थानकांवरील स्टॉलधारकांना केवळ फलाटांवर व आपल्या स्टॉल-हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ विकण्यास परवानगी आहे. त्यांना डब्यांत येऊन विकण्यास परवानगी नाही. तरीही स्टॉलधारक नियमबाह्य पद्धतीने गाडीत खाद्यपदार्थांची विक्री करतात. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना अशा स्टॉलधारकांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र ती कारवाई करण्याचे धारिष्ट ते कधी दाखवणार हा प्रश्न आहे.
“असे प्रकार चुकीचे आहेत. वाणिज्य व आरपीएफ विभाग एकत्रित येऊन अशांवर कारवाई करील. प्रवाशांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही.
उदयसिंग पवार, विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, पुणे.