लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पोलीस असल्याचे भासवून चारचाकी वाहनाचा क्रमांक बदलून देतो, असे सांगून विश्वास संपादन करून एक लाख रुपये घेतले. ते परत मागितले असता धमकी दिली. बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याकडे वाहनचालक म्हणून नोकरी करीत असलेल्या एकावर गुन्हा दाखल झाला आहे. तळेगाव दाभाडे येथे १ जानेवारी ते २७ मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला.
किरण सुरेश छेत्री (वय ३१, रा. लोहगाव), असे आरोपीचे नाव आहे. ज्योतिबा गुंडू निलजकर (वय ४१, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. ९) फिर्याद दिली आहे.
फिर्यादीने पैसे परत मागितल्यावर गाडीचे काम करण्यासाठी फिर्यादीकडून आणखी एक लाख रुपयांची मागणी केली. ते पैसे न दिल्यास आधी दिलेले एक लाख रुपये परत देणार नाही, अशी भीती दाखवली. तसेच आरोपीने फिर्यादीला व त्यांच्या मुलाला शिवीगाळ केली. फिर्यादीची मानलेली बहीण शिवांगी शर्मा हिला सोन्याचे कडे क्रेडिटवर घेऊन देतो, असे म्हणून आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. तिच्याकडून २२ हजार घेऊन तिला सोन्याचे कडे न देता तिचा विश्वासघात करून फसवणूक केली. पैशांची मागणी केली असता आरोपीने शिवीगाळ केली. पैसे परत देणार नाही, कोठे जायचे तेथे जा, असे म्हणून आरोपीने धमकी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपी त्यांच्याकडे वाहनचालक म्हणून नोकरीस असताना त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. तो वापरत असलेल्या गाडीच्या मागे पोलीस असे लिहून तो पोलीस असल्याचे त्याने भासवले. पोलीस खात्यातील मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी त्याची ओळख असल्याचे त्याने सांगितले. फिर्यादीच्या चारचाकी वाहनाचा क्रमांक बदलून कागदपत्र बनवून देतो, असे सांगून आरोपीने फिर्यादीकडून एक लाख रुपये घेतले. मात्र गाडीचे काम न करता फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केली.