सैन्य दलातून काढून टाकलेल्या संदीप लगडला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. याप्रकरणी सेवानिवृत्त लेफ्ट. कर्नल चंद्रशेखर रानडे ( रा. वाशी , नवीमुंबई ) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. अवैधरीत्या माजी सैनिक म्हणून लोकांची फसवणूक करणे, त्रिदल सैनिक सेवा संघ या संस्थेच्या नावाखाली खरे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सभासद नोंदणीकरिता स्वत:च्या फायद्यासाठी पैशांची देवाण-घेवाण करून फसवणूक करणे या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लगड हा रेजिमेंट ऑफ आर्टलरी विभाग नाशिक या सैन्य दलाच्या तुकडीत नाईक या पदावर कार्यरत असताना तो सैन्य दलाच्या तुकडीतून पळून आलेला असल्याने त्याला सेवेतून काढून टाकलेले आहे. दौंड पोलीस स्टेशनसह जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशनमध्ये संदीप लगड याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे घुगे यांनी सांगितले
संदीप लगड आणि महीला वकील रेश्मा चौधरी यांच्यासह अन्य दोघे दौंड येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात आले. दरम्यान, दिनेश चौधरी (रा. पाबळ) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल का करत नाही असे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना विचारणा करीत त्यांना अरेरावीची भाषा वापरून सरकारी कामात अडथळा आणला. म्हणून रेश्मा चौधरी आणि संदीप लगड विरोधात सरकारीकामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले.