पुणे : प्रवासी मोटारीची खासगी वाहतूक संवर्गात नोंदणी करण्यासाठी एकाकडून एक लाख ४७ हजार रुपये उकळणाऱ्र्या प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाच्या (आरटीओ) आवारातील एका दलालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल अर्जुन सोनवणे (रा. थिटेवस्ती, खराडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत अझीम मिसार इबुशे (वय २८, रा. कोल्हापूर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २८ जानेवारी २०२० पासून घडली आहे.
अझीम यांची मोटार प्रवासी वापरासाठी आहे. त्यांना खासगी वाहतूक संवर्गात मोटारीची नोंदणी करायची होती. त्यांनी जस्ट डायलवरून सोनवणे याचा नंबर मिळाला. त्यांनी आरटीओ कार्यालयात सोनवणे याची भेट घेतली. सोनवणेने मोटारीची खासगी संवर्गात नोंदणी करण्यासाठी १ लाख २५ हजार रुपये तसेच काम मार्गी लावण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
अझीम यांनी ऑनलाइन पद्धतीने सोनवणेला १ लाख ४७ हजार रुपये पाठविले. पैसे मिळाल्यानंतर सोनवणेने मोटार नोंदणी करून दिली नाही. अझीम यांनी त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा माझ्याकडून रक्कम खर्च झाली आहे. मी तुमचे काम करू शकत नाही. लवकरच तुमचे पैसे परत देईन, असे त्याने अझीम यांना सांगितले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अझीम यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड तपास करत आहेत.
---
सोनवणेविरोधात फसवणुकीचा दुसरा गुन्हा
आरटीओतील कामे करण्याच्या बतावणीने आरोपी विशाल सोनवणेने मध्यंतरी एका खासगी कंपनीला गंडा घातला होता. संबंधित कंपनी रेल्वे रूळ टाकण्याचे काम करते. खडी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या नोंदणीसाठी त्याने खासगी कंपनीकडून पैसे उकळले होते. त्यानंतर त्याने वाहनांची नोंदणीही करून दिली नव्हती. याप्रकरणी नुकताच सोनवणेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.