पुणे : मौजे बालवाडी येथील जागा हडपण्याच्या दृष्टीने तोतया माणसे उभी करून बनावट खरेदीखत तयार करीत एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
उत्तुंग कृष्णराव पाटील (वय ३४, रा. फ्लॅॅट नं ११, दीपलक्ष्मी हौसिंग सोसायटी, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. एका ८५ वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार १५ ते १८ ऑक्टोबर २०२० दरम्यान मौजे बालेवाडी येथील स.नं २२ हिस्सा नं. ११/५ पुणे तसेच दुय्यम निबंधक कार्यालय हवेली १७ येथे घडला.
हिरकणी बिल्डकॉनतर्फे उत्तुंग कृष्णराव पाटील यांनी तीन अज्ञात व्यक्तींशी संगनमत करून फिर्यादी, त्यांचा मुलगा व मुलगी यांच्या ऐवजी तोतया माणसे उभी करून व त्यांच्या नावाने त्यांचे खोटे फोटो, पॅॅन कार्ड व खोटे आधार कार्ड लावत त्यांच्या नावाने खोट्या सह्या व अंगठे वापरून जागा हडपण्याच्या दृष्टीने बनावट खरेदीखत तयार केले. या बनावट खरेदीखताचा वेळोवेळी वापर करून फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करायची आहे, आरोपीने बनावट खरेदीखतात दीड कोटी रुपयांचे तीन डीडीडी हे एका बँकेच्या दोन शाखांमध्ये सादर केले, या रकमेसंदर्भात तसेच बँक खाते व डीडीडीसंदर्भात तसेच खोट्या कागदपत्रांसंदर्भात आरोपीकडे तपास करायचा असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील ॲॅड. विशाल मुरळीकर यांनी करीत आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली.