लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुदत ठेवीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून १ कोटी ९१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक जगदीश उणेचा यांना अटक केली.
याप्रकरणी सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे राहणार्या एका ६६ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार जगदीश उणेचा, त्यांची पत्नी व मुलगा राकेश उणेचा या तिघांवर ठेवीदार हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे आर्किटेक्चर असून जगदीश उणेचा हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दोघे एकमेकांचे परिचित आहेत. त्यांनी यापूर्वी एकत्र कामे केली आहेत. जगदीश उणेचा यांनी फिर्यादी यांना उणेचा असोसिएटसमध्ये मुदत ठेव ठेवल्यास त्यावर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. ही रक्कम जास्त दिवस ठेवल्यास मोठा परतावा देईल, असे सांगितले होते. त्यानुसार फिर्यादी यांनी एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. स्कीमबाबत विश्वास वाटावा म्हणून उणेचा यांनी काम बंद पडलेले असताना देखी बांधकाम जोरात सुरू आहे. फ्लॅटचे बुकिंग चालू असल्याचे खोटे दर्शवून ठेव ठेवल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. मात्र, त्यानंतर २०१६ पासून त्यांनी परतावा देणे बंद केले. फिर्यादी यांच्या पाठपुराव्यानंतरही त्यांनी पैसे न दिल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीखक झरेकर अधिक तपास करीत आहेत.