पुणे : महिलेवर सातत्याने लैंगिक अत्याचार करण्याबरोबरच जीवे ठार मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरारी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुनील मधुकर जगताप असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. यात जगताप याच्यासह कोमलसिंग डोंगरसिंग वाणी (वय ४५ हडपसर), राजेश काळूराम गायकवाड (वय ४३, खराडी), बबीता पगारे (वय ६०) अशा तीन जणांवर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी एका ५० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना ८ डिसेंबर २०१६ ते १० जून २०२० दरम्यान घडली. आरोपीने फिर्यादीला बिल्डरला भेटवण्यासाठी बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून वाणी आणि गायकवाड यांनी त्याचे व्हिडीओ शूटिंग केले. फिर्यादीची मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्यासाठी जीवे ठार मारण्याची धमकी आणि शिवीगाळ करून विविध रकमा घेऊन १० लाख रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणात वाणी आणि गायकवाड यांना न्यायालयाने ८ जानेवारी २०२१ ला नॉमिनल अटक करून जामीन मंजूर केला आहे तर पगारे या १७ ऑक्टोबर २०२० रोजी मयत झाल्या आहेत. आरोपी सुनील जगताप याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने आणि उच्च न्यायालयात केलेला जामीन अर्ज आरोपीने स्वत:हून काढून घेतल्यामुळे पोलीस त्याच्या शोधात होते. मात्र त्याचा शोध लागत नव्हता. परंतु आरोपी स्वत:हून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असता त्याला न्यायालयात हजर केले. आरोपी याने फिर्यादीकडून रोख स्वरूपात वेळोवेळी ४ लाख रुपये घेतले आहेत. ही रक्कम आरोपीकडून जप्त करायची आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या काही कोरे कागद आणि स्टँप पेपरवर धमकी देऊन सह्या घेतल्या आहेत. हे स्टँप पेपर अर्जदार आरोपी यांच्याकडून जप्त करायचे आहेत. हा महिलाविषयक अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.