पुणे : शहरातील नामांकित महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याच्या बहाण्याने सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
त्यासंदर्भात शनिवारी (दि. १०) चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. साधारणत: २ सप्टेंबर २०२० ते २३ डिसेंबर २०२० दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला.
याप्रकरणी सुहास नारायण ओव्हाळ (रा. क्लासिजम सोसायटी, बोपोडी) यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार मेडवेल कंपनीचे संचालक राहुल यादव व समीर सिंग यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: विविध महाविद्यालयांमध्ये आपल्या थेट ओळखी आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीही आपण प्रवेश देऊ शकतो, अशी बतावणी संशयित आरोपीनी केली होती. ओव्हाळ यांच्या मुलीला एमएबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी आरोपीनी त्यांच्याकडून तीस लाख रुपये घेतले. तसेच अन्य दोघांकडूनही अशाच मोठ्या रकमा उकळल्या. पैसे घेऊनही प्रवेश न मिळाल्याने ओव्हाळ यांनी पोलिसांकडे धाव घेतली. दोन्ही आरोपी पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.