लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचा व्यापार करणारे बबन नामदेव शिंदे (रा. मंचर) यांची नितीन बाबूराव काळे (रा. गोनवडी, घोडेगाव) याने विश्वास संपादन करून शिंदे यांच्याकडून वेळोवेळी क्रेडिटवर तरकारी भाजीपाला उधारी नेला. सुमारे ७ लाख ४३ हजार २७९ रुपयांची व तरकारी भाजीपाला वाहतुकीसाठी भाड्याने आलेल्या ट्रक मालकाची ७ लाख ६० हजार अशी एकूण १५ लाख ३ हजार २७९ रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत नितीन काळे यांच्याविरोधात बबन नामदेव शिंदे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बबन नामदेव शिंदे यांचा मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचा गाळा आहे. ते शेतकऱ्यांचा माल घेऊन तो इतर व्यापाऱ्यांना होलसेल व किरकोळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे नितीन बाबूराव काळे हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून माल घेण्यास येत जात असतात. हा व्यवसाय क्रेडिटवर चालत असल्याने काळे यांनी माल क्रेडिटवर देण्याची विनंती केली. त्यामुळे शिंदे यांनी त्यांचे पहिले व्यवहार चांगले असल्याने त्यांना नोव्हेंबर २०१९ पासून ते ऑगस्ट २०२० पर्यंत माल दिला. नोव्हेंबर २०२० मध्ये उधारी खाते बंद करून नवीन खाते सुरू करायचे असल्याने शिंदे यांनी काळे यांना फोन करून झालेली ७ लाख ४३ हजार २७९ रुपयांची उधारी जमा करण्यास सांगितले. काळे यांनी रक्कम जमा करतो, असे सांगून ते कुठेतरी निघून गेले. त्यावेळी शिंदे यांनी त्यांना संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागल्याने त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली.
घरच्यांनी ते बाहेर गेले असल्याचे सांगितले. त्यानंतर शिंदे यांना समजले की नितीन काळे याने भाजीपाला वाहतुकीसाठी सचिन शंकर मोरडे यांचा ट्रकमध्ये भाजीपाला मालवाहतूक करून त्यांचेही भाड्याचे ७ लाख ६० हजार रुपये दिलेले नाहीत. यामुळे आपली फसवणूक होत असल्याची खात्री झाल्यानंतर बबन शिंदे व सचिन मोरडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र हिले पुढील तपास करत आहेत.