लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खराडी येथील प्लॉटवर बांधकाम करुन देण्यासाठी पैसे घेऊन मुदतीत बांधकाम पूर्ण न करता ३ कोटील ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
अमित कृष्णलाल नागपाल (वय ४८), अशिष कृष्णलाल नागपाल (वय ४३, दोघे रा. सिंध हिंदु सोसायटी, लुल्लानगर), रामदास आनंदराव कामठे (वय ५६) आणि प्रकाश आनंद कामठे (वय ५९, दोघे रा. चंदननगर, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी साहील श्रावण मोहन (वय ३५, रा. नवी दिल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २००७ पासून सुरु होता. यातील आरोपींनी फिर्यादी मोहन चे खराडी येथील प्लॉटवर १६ फ्लॅटचे बांधकाम पूर्ण करुन देण्यासाठी नागपाल यांनी २ कोटी ४० लाख रुपये घेतले. त्यांना करारानुसार मुदतीत बांधकाम पूर्ण करुन न देता तसेच त्यांची रक्कम देखील परत न करता ती स्वत:च्या व्यावसायात वापरली. रामदास कामठे यांनी नागपाल असोसिएटचे भागीदार असल्याचे अगोदर सांगितले. मात्र, फिर्यादीना बांधकामाचा ताबा देण्याचे वेळी आपण नागपाल यांचे भागीदार असल्याचे नाकारुन फिर्यादी यांची फसवणूक केली. प्रकाश कामठे यांनी फिर्यादी यांना खरेदी करावयाच्या मालमत्तेचा बनावट टायटल रिपोर्ट बनवून व तो फिर्यादी यांना दाखवून मालमत्ता खरेदीसाठी प्रवृत्त केले व चौघांनी संगनमत करुन फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक चौधरी अधिक तपास करीत आहेत.