बारामती : राष्ट्रीय खत कंपनी झुआरी अॅग्रो केमिकल लिमिटेड कंपनीची मेल आयडी हॅक करुन बनावट मेल आयडी वापरत कोटयावधींची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे.याबाबत बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. दोन कंपन्यांचे मेल आयडी हॅक करून खोट्या मेल आयडीद्वारे बँक डिटेल्स पाठवून सुमारे ४ कोटी ९७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याबाबत झुआरी कंपनीकडून याबाबत येथील कार्यालय व्यवस्थापक जुजे जोकिम बरेटो (रा. अभितेज गॅलक्सी, बारामती) यांनी ग्रामीण पोलीसांत फिर्याद दिली आहे. ११ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे गोव्यात जयकिसान भवन, झुआरीनगर येथे आहे. कंपनीची बारामती एमआयडीती विद्राव्य खत बनविणारी कंपनी आहे. या कंपनीसाठी लागणारा कच्चा माल जगभरातील वेगवेगळ्या कंपन्यांकडून घेतला जातो. कंपनी गेली दहा वर्षांपासून दक्षिण दुबई यूएईमधील आरएनझेड इंटरनॅशनल एफझेडई कंपनी या पुरवठादाराकडून मोनो अमोनियम, फॉस्फेट, मोनोपॉटेशियम असा कच्चा माल घेते. २ सप्टेंबर २०१८ ते २३ सप्टेंबर २०१८ या कालावधीत झुआरीने या कंपनीकडून ४ कोटी ९७ लाख रुपयांचा १५७० टन माल घेतला. डिसेंबर २०१८ मध्ये झुआरीला ही आॅर्डर पोहोच झाली. दुबईतील कंपनीचे देणे काही कारणास्तव राहिले होते.
ही रक्कम देण्यासाठी झुआरीने आरएनझेड इंटरनॅशनल कंपनीच्या रमेश आनंदन यांच्या मेल आयडीवर बँक डिटेल्स देण्यासंबंधीचा मेल ११ डिसेंबर रोजी केला होता. दि. १४ रोजी त्यांच्याकडून बँक डिटेल्स पाठविण्यात आले. रक्कम जमा केल्यानंतर त्याच्या सॉफ्ट कॉपीज पाठवाव्यात, अशी मागणी आरएनझेड कंपनीने केली होती. त्यानुसार झुआरीने आरएनझेड कंपनीला रक्कम पाठवण्याबाबत पणजी येथील युनियन बँकेला मेलद्वारे कळविले. बँकेने २४ डिसेंबर रोजी ही रक्कम झुआरीने दिलेल्या बँक खात्यावर वर्ग केली. बँकेने रक्कम जमा केल्यानंतर त्यासंबंधीची कागदपत्रे झुआरीला दिली. झुआरीने पुढे ती आरएनझेड कंपनीला पाठवली असता या बँक डिटेल्स आमच्या कंपनीच्या नसल्याचे तसेच तुम्ही चुकीच्या खात्यावर पैसे वर्ग केल्याचे आरएनझेड कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानंतर झुआरीने तात्काळ बँकेशी संपर्क साधत ज्या खात्यावर पैसे वर्ग केले आहेत, त्या खात्याचा केवायसी तपशील देण्याची मागणी केली.झुआरीने आरएनझेड कंपनीला यापूर्वी केलेले मेल तपासल्यानंतर बरोबर असल्याचे स्पष्ट झाले. परंतु त्या कंपनीसह झुआरीचा मेल आयडी कोणी तरी हॅक करून वेगळ्याच बँक खात्याचे डिटेल्स पाठवून त्यावर रक्कम वर्ग करून घेत फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
ग्रामीण पोलिसांनी अज्ञाताविरोधात फसवणूकीसह माहिती-तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.