लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खासगी कंपनीतील उच्चपदस्था ६० वर्षीय महिलेला भेटवस्तूचे आमिष दाखवून तब्बल ४ कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या तिघा नायजेरियन नागरिकांना सायबर पोलिसांनी दिल्लीत अटक केली. पुणे सायबर पोलिसांची दिल्लीतील ही सलग तिसरी कारवाई आहे.
जंगो निकोलस (वय २९), मंडे ओकेके (वय २६) आणि पॉलिनस मॅबानगो (वय २९, सर्व रा. निलोठी एक्सटेंशन, नवी दिल्ली, मुळ रा. लोगास, नायजेरिया) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींकडून २३ मोबाईल हँडसेट, ४ लॅपटॉप, १ हार्ड डिस्क, ५ डोंगल, ३ पेन ड्राईव्ह, ८ मोबाईल सीम कार्डस, ३ डेबिट कार्डस व इतर कागदपत्रे जप्त केली आहेत.
एका नामांकित कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या ६० वर्षाच्या महिलेची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. त्याने इंटरनॅशनल फोनद्वारे संपर्क करुन महागडी भेटवस्तू पाठविल्याची बतावणी केली. भेटवस्तू घेऊन आलेल्यास विमानतळावर अडविले असून सोन्याचे दागिने व परकीय चलन सोडविण्याच्या बहाण्याने त्यांनी पैसे पाठविण्यास सांगितले. नंतर त्या व्यक्तीला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी, वैद्यकीय उपचारासाठी पैसे लागत असल्याचे सांगून या महिलेला वेगवेगळ्या बँकेत पैसे भरायला सांगितले.
आपली फसवणूक होत असल्याचे या महिलेच्या लक्षात आल्यावर तिला आरोपींनी बदनामी करण्याची तसेच तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. तिच्याकडून २१ सप्टेंबर २०२० ते मार्च २१ दरम्यान २५ बँकांमधील ६७ बँक खात्यावर ३ कोटी ९८ लाख ७५ हजार ५०० रुपये पाठविण्यास भाग पाडले. शेवटी या त्रासाला कंटाळून या महिलेने पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची भेट घेऊन त्यांना आपली हकीकत सांगितली.
सायबर पोलिसांनी अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या गुन्ह्यात तांत्रिक तपासाचे सहाय्याने आरोपी हे नवी दिल्लीत असल्याचे शोधून काढले. दिल्लीला पथक पाठवून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि तिघा नायजेरियनांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहायक आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, तपासी अधिकारी अंकुश चिंतामणी, संगीता माळी, सहायक निरीक्षक गणेश पवार, उपनिरीक्षक अजुर्न बेंदगुडे, पोलीस अंमलदार अस्लम आत्तार, संदेश कर्णे, मंगेश नेवसे, योगेश वाव्हळ, नितेश शेलार, प्रविणसिंग राजपूत, शिरीष गावडे, प्रसाद पोतदार, अमोल कदम, संदीप यादव, श्रीकांत कबुले, नीलम साबळे, अंकीता राघो, उमा पालवे, पुजा मांदळे या पथकाने केली.
चौकट
पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी व त्यांचे सहकारी गेल्या २ आठवड्यापासून दिल्लीत तळ ठोकून असून त्यांनी सायबर पोलीस ठाण्यातील ३ वेगवेगळ्या गुन्ह्यातील ८ आरोपी व गुन्ह्यातील साधने ताब्यात घेतलेली आहेत.