लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: आंबेगाव तालुक्यातील तिन शेतकऱ्यांना ऊस तोडणी मजूर पुरवितो असे सांगून शेतकऱ्यांकडून ७१ लाख १२ हजार ९०० रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन ऊस तोडणी करणाऱ्या मुकादमांना मंचर पोलिसांनी चाळीसगाव येथे जाऊन अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी नवनाथ कोंडीभाऊ शिंदे (रा. साकोरे ता. आंबेगाव) यांनी व इतर ७ ते ८ शेतकरी यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ऊस गाळप हंगाम करीता ऊसतोड कामगार मिळावे यासाठी वेगवेगळे तीन ऊसतोड मुकादम यांना एकूण ७१ लाख १२ हजार ९०० रुपये दिले होते. मात्र पैसे देऊनही कराराप्रमाणे या मुकादमांनी कोयते व ऊसतोड कामगार पुरविले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली आर्थिक फसवणूक झाल्याने मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या मुकादमांनी अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पो. ना. खैरे, पो. ना. अजित मडके, पो. कॉ. वाघ, पोलिस कॉन्स्टेबल रोडे यांच्या पथकाने चाळीसगाव (जि, जळगाव) येथे जाऊन मुकादम श्रावण जगन राठोड, नितीन पंडित पाटील, अनिल पंडित जाधव यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना बुधवार (दि १०) पर्यंत पोलीस काेठडी दिली आहे. या आरोपींनी परिसरातील अजून कुठल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली असेल तर त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी केले आहे.