पुणे : एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून ७४ हजार रुपये काढून घेतले. ही घटना टिंबर मार्केट परिसरातील एका एटीएम सेंटरमध्ये घडली. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जयपालराम रामदेवजी काला (रा. टिळेकरनगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. काला हे २० जानेवारी रोजी टिंबर मार्केट येथील एका एसबीआयच्या एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण, पैसे निघाले नाही. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे असलेल्या व्यक्तीने त्यांना पैसे काढण्यास मदत करण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले. कार्ड एटीएममध्ये टाकून पीन क्रमांक विचारून घेतला. तो पीन क्रमांक टाकला. पण, पैसे निघाले नाहीत. दरम्यान हात चलाखी करत फिर्यादींना त्यांचे एटीएम कार्ड देण्याऐवजी दुसरेच कार्ड हवाली केले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून ७४ हजार रुपये काढले. पैसे कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर फिर्यादींना खात्यातून पैसे काढल्याचे समजले. त्यावेळी त्यांनी एटीएम कार्ड पाहिल्यानंतर ते त्यांचे नसल्याचे लक्षात आले.
एटीएम कार्ड बदली करून ७४ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:11 AM