पुणे : कंपनीमध्ये काम करणाऱ्यांना ३३ सदनिकांचे अपूर्ण काम विश्वासाने देखरेखीखाली पूर्ण करण्यास देण्यात आले होते. मात्र, त्यांनी कटकारस्थान करून बनावट ठेकेदार निर्माण करीत बँकेच्या वेगवेगळ्या खात्यात खोट्या सह्या करून ८६ लाख सहा हजार ६०६ रुपये वर्ग करीत फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला. विशेष न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.
नितीन पितांबरदास मेवावाला (वय ४१ वर्ष, रा. एस गोल्फशायर फ्लॅॅट नं ३०३२, टी ३ सेक्टर १५० नोएडा, उत्तर प्रदेश) आणि फहिम फिरोज खान (वय ४२ वर्षे रा. ५२/५०३, फ्युचर टायर, अमनोरा टाऊन, हडपसर, पुणे) अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. सनसिटी वडगाव शेरी येथे राहाणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोघांसह गौरव रमेश जैन (वय ३७ वर्षे, रा. इडनवूडस, फ्लॅॅट नंबर २०६, लेन नंबर २, शास्त्रीनगर, अंधेरी (पश्चिम) मुंबई) याच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१२ ते २०१८ दरम्यान फिर्यादीच्या बँक खात्यावरून रक्कम दुसऱ्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. फिर्यादीच्या पतीची ब्रह्मा रिॲॅलिटी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनी आहे. त्यांचे पती कंपनीच्या माध्यमातून हॉटेल व कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात.
दोन्ही आरोपी हे कंपनीत कामाला होते. मात्र त्यांनी बनावट ठेकेदार तयार करून त्यांच्या नावाने वेगवेगळ्या बँकेत फॉर्म आणि केवायसी कागदपत्रांवर खोट्या सह्या करून त्यांची बँक खाती उघडली आणि फिर्यादीच्या बँक खात्यातून ८६ लाख सहा हजार ६०६ रुपये वर्ग करून त्यांची फसवणूक केली. या दोघांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, अतिरिक्त सरकारी वकील ॲड. रमेश घोरपडे यांनी जामिनाला विरोध केला. हा गुन्हा घडल्याचा कालावधी सहा वर्षांचा आहे. संबंधित बँक आणि संस्थांकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने कागदपत्रे मिळण्यास आणि साक्षीदारांकडे तपास करण्यास विलंब होत आहे. आरोपींना जामीन मिळाल्यास पुरावे नष्ट होण्याची आणि साक्षीदारांवर दबाव निर्माण करण्याची शक्यता आहे.
याशिवाय गुन्ह्यातील अपहार केलेले ८६ लाख सहा हजार ६०६ पैसे कोठे गुंतवणूक करायचे आहेत याबाबत तपास करणे गरजेचे आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या नातेवाइकांना सीआरपीसी १६०ची नोटीस पाठवली आहे. मात्र अजूनही ते तपासासाठी हजर राहिलेले नाहीत, असा युक्तिवाद ॲॅड घोरपडे यांनी केला. तो ग्राह्य धरीत न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला. ॲड. विक्रम घोरपडे यांनी कामकाजात सहकार्य केले.