लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कंपनीतील प्लॉटच्या बांधकामासाठी व मशिनरी खरेदी करण्यासाठी १६ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगून माॅर्गेज ॲग्रीमेंटसाठी ३२ लाख ३८ हजार रुपये घेऊन फायनान्स कंपनीने एका व्यावसायिकाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी नीलेश सुभाष उपासनी (वय ४८, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीजी, एसव्ही फायनान्स अॅड इन्व्हेसमेंट या कंपनीचे प्रमुख हेमंत जोशी (वय ४५, रा. घाटकोपर, मुंबई), संजय जगन्नाथ अहिरे (रा. ठाणे) या दोघांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार टिंगरेनगरमध्ये १७ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२१ दरम्यान घडला.
उपासनी यांची भागीदारीमध्ये डी एमएसएस इन्फ्रा इंडिया प्रा़ लि. ही कंपनी आहे. कंपनीच्या केमिकल प्लाॅटच्या बांधकामाचे काम सुरू आहे. त्यासाठी कंपनीला कर्जाची गरज होती. उपासनी यांनी कर्ज मिळवण्यासाठी कंपनीचे हेमंत जोशी व अहिरे यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी त्यांना १६ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कर्जाचे मॉर्गेज अॅग्रीमेंटसाठी त्यांना ३२ लाख ३८ हजार रुपये मुलुंड येथील एका बँक खात्यावर भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पैसे भरल्यावर त्यांना ठाणे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रेशनसाठी बोलावले. उपासनी ठाणे येथे गेले. परंतु, हे दोघे आलेच नाही. त्यांचे फोन बंद होते. त्यांनी टिंगरेनगर येथील फायनान्स कंपनीच्या कार्यालयात गेल्यावर कार्यालय बंद आढळून आले. तसेच ही कंपनीही बोगस असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.