लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सदनिका खरेदीची रक्कम देऊनही त्याचा वेळेत ताबा न देण्याबरोबरच बनावट दस्ताऐवजाद्वारे एक सदनिका दोन ग्राहकांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या भागीदारांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आरोपींनी २२ ग्राहकांकडून २ कोटी ३ लाख ८२ हजार घेत फसवणूक केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले आहे.
आकाश अरविंद मोहिते (वय ४०, रा. खडी मशिन चौक, कोंढवा), संभाजी बबन निवंगुणे (वय ४१, रा. धायरी), पोपट गुलाबराव निवंगुणे (वय ४०, रा. धनकवडी) असे न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्यासह आणखी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी संतोष रामचंद्र साळवी (वय ४६, रा. जनता वसाहत, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धायरीतील साई आंगण फेज २ येथे २०१५ ते आॅगस्ट २०२१ दरम्यान हा प्रकार घडला.
फिर्यादींनी धायरीतील शिवशंभो डेव्हलपर्सचे आकाश मोहिते यांच्याकडून २०१५ मध्ये १० लाख ९५ हजार रुपये देत सदनिका खरेदी केली. करारनाम्याप्रमाणे ११ महिन्यांच्या आत सदनिकेचा ताबा देण्याचे ठरलेले असतानाही अद्याप ताबा दिला नाही. माझ्याविरोधात तक्रार दिली तर इमारत पाडून टाकेन अशी धमकी फिर्यादीला देण्यात आली. आरोपी आकाश मोहिते याने साई आंगण फेज २ मधील एक सदनिका दोन ग्राहकांना विक्री करून फसवणूक केली असल्याचे देखील फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी (दि.२३) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी फिर्यादीसह इतर ग्राहकांचा विश्वास संपादन करून आर्थिक फायद्यासाठी फसवणूक करीत त्यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. मूळ दस्त प्राप्त करणे, सदनिका विक्रीतून जमवलेली रकमेचा वापर कोठे केला आहे याचा तपास करणे, एक सदनिका दोघांना विक्री केली आहे. याबाबत तपास करणे, या प्रकरणात आणखी ग्राहकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असून त्या संदर्भात तपास करण्यासाठी आरोपींना आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. आरोपीच्या वतीने वकील मिलिंद पवार यांनी विरोध केला.
----------------------------------