पुणे : बनावट कागदपत्रे बनवून जागा, फ्लॅटची विक्री करुन फसवणूक करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसून येते. त्यात काही लाखांपासून कोटी रुपयांची फसवणूक केली जात असते. मात्र, बनावट कागदपत्रे तयार करुन चक्क झोपडी विकून फसवणूक केल्याचा गुन्हा येरवडा पोलिसांनी दाखल केला आहे.
प्रकाश शेंडकर (रा. साक्षी रेसिडेन्सी, वडगाव धायरी) आणि नारायण बाबुराव विधाते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अजय मारुती शेंडकर (वय ५०, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, येरवडा येथील गणेशनगरमध्ये झोपडी क्रमांक २९ हिची मालकी अजय शेंंडकर यांची आहे. त्यांचा सावत्र चुलता प्रकाश शेंडकर याने फिर्यादीची बनावट सही करुन सय्यद मोहम्मद हसन यांना विकली. त्यानंतर हसन यांनी शमीम उस्मान यांना तिची विक्री केली. त्यासाठी नारायण विधाते यांनी १९९० सालचे बनावट कागदपत्र तयार करुन खरेदी करुन फिर्यादी यांची फसवणूक केली. येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.