पुणे : वकिलांसमक्ष नोटरी करून मालकच्या परस्पर टेम्पो विकून सव्वातीन लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आशिष सिद्धेश्वर तोडकरी (रा. शांतिदूत सोसायटी, पर्वती) आणि रवीकांत प्रल्हाद मोरे (वय ४५, रा. शिवदर्शन, पर्वती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीकांत बसप्पा कुंभार (वय २५, रा. जत, जि. सांगली) यांनी मार्केट यार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून तोडकरी यांच्याकडील टेम्पो आपल्या मालकीचा आहे, असे खोटे सांगून या गाडीवर असलेले चोला मंडल फायनान्सचे कर्ज वापरण्यास मिळेल, असे आमिष दाखवून गाडी विक्रीचा व्यवहार केला. वकिलांच्या समक्ष नोटरी करून कुंभार यांच्याकडून २ लाख २१ हजार रुपये घेतले. हा व्यवहार मार्केट यार्डमधील महालक्ष्मी मार्केट येथील कार्यालयात ११ ऑगस्ट २०२० रोजी झाला होता. टेम्पोचे मूळ मालक दत्तात्रय साळुंखे (रा. मोडनिंब, माढा, जि. सोलापूर) यांच्या परवानगीशिवाय आरोपींनी नोटरी करून देऊन टेम्पो विकून फसवणूक केली.