पुणे : विमा पॉलिसीची रक्कम एकदम भरल्यास ७ लाखांचा फायदा होईल, असे सांगून सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिक महिलेला १ लाख ४२ हजारांना गंडा घातला. अधिक पैसे देतो, दुप्पट पैसे मिळतील, असे सांगून अनेकदा फसविले जात असल्याचे समोर येत आहे.
याप्रकरणी औंध रोड येथे राहणाऱ्या ६२ वर्षांच्या महिलेने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना एप्रिल २०२१ मध्ये घडली आहे. फिर्यादी महिलेला एका अनोळखी मोबाईलवरून मेसेज पाठवून तसेच वेळोवेळी फोन करून आपण एका नामांकित लाईफ इन्शुरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या कंपनीने फ्री मॅच्युअल स्कीम सुरू केल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. तुमच्या पॉलिसीचा ४७ हजार ५०० रुपयांचा हप्ता भरल्यास २ लाख ४० हजार रुपये परतावा मिळेल अशी बतावणी केली. त्यांनी त्याप्रमाणे सांगितलेल्या खात्यात पैसे भरले. त्यानंतर सायबर चोरट्याने पुन्हा पॉलिसीचे ९५ हजार रुपयांचा हप्ता भरल्यास त्यांना ७ लाख रुपयांचा फायदा होणार असल्याचे आमिष दाखविले. त्यानुसार त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर गुगल पे द्वारे पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांना आपली १ लाख ४२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोलीस निरीक्षक पठाण तपास करीत आहेत.