पुणे : पुण्यातल्या तेलगी स्टॅम्प पेपर घाेटाळ्याने सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले असताना आता पुन्हा एकदा पुण्यात स्टॅम्प घाेटाळा उघडकीस आला आहे. काेषागार अधिकारी प्रथम मुद्रांक लिपीक काेषागार पुणे करीता असा बनावट शिक्का तयार करुन ताे 100 आणि 500 च्या स्टॅप्म पेपरवर उमटवून त्याचा गैरवापर केल्याची घटना समाेर आली आहे. याप्रकरणी पुण्यातील कसबा पेठेत राहणाऱ्या देशपांडे कुटुबिंयांना पाेलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाबाबत पाेलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली हाेती. पाेलिसांनी देशपांडे यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता हा प्रकार समाेर आला. या प्रकरणी विश्रामबाग पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी चिन्मय सुहास देशपांडे (वय 26), सुहास माेरेश्वर देशपांडे (वय 59), सुचेता सुहास देशपांडे (वय 54, सर्व रा. पारसनीसवाडा, कसबा पेठ) यांना अटक केली आहे. पाेलिसांनी शनिवार पेठेतील दुकानातून तसेच बुधवार पेठेतील लाल महाल समाेर असणाऱ्या कमला काेर्ट या इमारतीच्या देशपांडे व्हेंडर या कार्यालयातून 68 लाख 38 हजार 170 रुपयांचे बनावट शिक्के मारलेले स्टॅम्प पेपर जप्त केले आहेत. देशपांडे कुटुंबियांना कुठलाही अधिकार नसताना वरिष्ठ काेषागार अधिकारी प्रथम मुद्रांक लिपीक काेषागार पुणे करीता असा शिक्का त्यांनी तयार केला हाेता. ताे शिक्का 100 व 500 रुपयांच्या स्टॅप्म पेपरवर उमटवून त्यावर सही करुन त्या स्टॅम्प पेपर्सचा गैरवापर करण्यात येत हाेता.
पाेलिसांना या प्रकरणाबाबत माहिती मिळताच पाेलिसांच्या पथकाने देशपांडे यांच्या दाेन्ही कार्यालयांवर छापे टाकले. यात 68 लाख 38 हजार 170 रुपयांचे स्टॅम्प पेपर आढळून आले. एकीकडे शहरातील अनेक स्टॅम्प व्हेंडर्सकडे स्टॅम्प उपलब्ध नसताना देशपांडे कुटुंबियांकडे इतक्या माेठ्या रकमेचे स्टॅम्प आले कुठून याबाबत पाेलीस तपास करीत आहेत. तसेच मिळून आलेले स्टॅम्प पेपर खरे आहेत की नाही याबाबत तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास विश्रामबाग पाेलीस करत आहेत. ही कामगिरी पाेलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पाेलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पाेलीस निरीक्षक सुनिल कलगुटकर, पाेलीस निरीक्षक (गुन्हे) दादासाहेब चिवडप्पा, पाेलीस उपनिरीक्षक विजय जाधव व इतर तपास अधिकाऱ्यांनी केली.