लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अगोदरच ८४ लाख रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल असताना, चुकीची माहिती देऊन त्या आधारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. डीएसकेची पोर्शे कार देण्याचा बहाणा करून फसवणूक केल्याच्या प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी रौनक ओसवाल यांच्याविरुद्ध ५ कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे उस्मान तांबोळी यांनी सांगितले.
याबाबत उस्मान तांबोळी यांनी सांगितले की, व्यवसायासाठी घेतलेले ८४ लाख रुपये परत न करता, फसवणूक केल्याप्रकरणी आपण समर्थ पोलीस ठाण्यात रौनक दिलीप ओसवाल व संगीता दिलीप ओसवाल यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. समर्थ पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे, तसेच त्यांनी मर्सिडीज गाडी देण्याच्या बहाण्याने १० लाख रुपये घेऊन गाडी दिली नाही. या गुन्ह्यात रौनक ओसवाल यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ओसवाल याने न्यायालयात खोटी तक्रार करून, गुन्हा दाखल करण्याचा आदेश घेतला आहे. बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांची जप्त केलेली महागडी कार कमी किमतीत मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाकडून ४३ लाख रुपये उकळल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. वास्तविक या प्रकरणांशी आमचा काहीही संबंध नाही. याबाबत आम्ही सत्र न्यायालयात सर्व वस्तुस्थिती स्पष्ट केल्यानंतर अतिरक्त सत्र न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांनी ओसवाल यांनी १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करायला स्थगिती दिली आहे. असे असताना आमची बदनामी केल्याबद्दल रौनक ओसवाल यांच्यावर ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे उस्मान तांबोळी यांनी सांगितले.