पुणे : पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार कसबा पेठ परिसरात घडला आहे. फक्त २ दिवसात सायबर चोरट्याने फिर्यादी महिलेकडून ३ लाख ३० हजार रुपये उकळले.
एका ३८ वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना अनोळखी क्रमांकावरून पार्ट टाइम जॉब साथीचा मेसेज आला. त्यांनतर काही पैसे भरून त्यावर चांगला मोबदला मिळेल असे सांगून सुरुवातीला नफा देऊन महिलेचा विश्वास संपादन केला. त्यांनतर प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून वेळोवेळी महिलेकडून एकूण ३ लाख ३० हजार रुपये उकळले. मात्र काही कालावधीनंतर गुंतवणूक केलेल्या पैश्यांची परतफेड मिळाली नाही म्हणून महिलेने विचारणा केली. महिलेला कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मंगेश जगताप हे पुढील तपास करत आहेत.