पुणे : जमीन-विक्री व्यवहारातील ठरलेल्या रकमेपैकी केवळ १५ लाख रुपये रक्कम देऊन उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करून महिलेस जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
एका ४५ वर्षीय गृहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार अमित देवराम कलाटे (रा.स.नं १६५, वाकड चौक) याला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी बंटी कलाटे हा फरार आहे. ऑक्टोबर २०१८ पासून ते मे २०२१ दरम्यान ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांची मौजे कासारसाई येथील सर्वे नंबर १९/१ मधील त्यांच्या वाट्याची ६४ एकर जमीन त्यांच्याकडून १ कोटी १५ लाख रुपये किमतीत विकत घेण्याचे ठरविले. त्याबाबत दि. ३० ऑक्टोबर रोजी आरोपी अमित कलाटे याने त्याच्या ऑफिसमध्ये खरेदीखतावर फिर्यादीच्या सह्या घेतल्या. त्यानंतर खरेदीखतामधील भरणा तपशीलाचे पान बदलून त्या खरेदीखतामध्ये नोंद केल्याप्रमाणे रोख रक्कम आणि १५ धनादेश न देता दुसरेच आरोपीचे नाव आणि रोख रकमेचा कोणताही मजकूर नसलेले धनादेश दिले. जमीन- विक्रीची ठरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करून फिर्यादी रक्कम मागण्यास गेली असता त्यांना जिवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ करून हाकलून देण्यात आले असे फिर्यादीत म्हटले आहे.आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. दुय्यम निबंधक मुळशी क्र.२ यांच्या कार्यालयात केलेला खरेदीखत दस्त नोंदणी कोणत्या प्रकारे व कशा स्वरूपाचा केला आहे.त्याबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे. ६४ गुंठे जमिनीचा सातबारा आरोपींच्या नावावर नसताना कोणाच्या मदतीने बनावट दस्तऐवज तयार करून जमीन-विक्री केली आहे.याबाबत त्यांच्याकडे सखोल तपास करणे गरजेचे आहे.फरार असलेला दुसरा आरोपी बंटी कलाटे याच्या ठावठिकाणाबाबत अटक आरोपीकडे तपास करून त्याला अटक करायची आहे. तसेच अटक आरोपींनी अशाप्रकारे आणखीन काही गुन्हे केले असल्याची दाट शक्यता आहे. दोन्ही आरोपींवर अशाप्रकारचा आणखी एक गुन्हा हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. याकरिता सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
--------------------------------------------