पुणे : सायबर चोरटे पेटीएम अकाऊंटचे व्हेरिफिकेशन व केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने पेटीएम वापरकर्त्यांना फोन करतात व त्यांच्याकडून बँक अकाऊंटची व डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डची माहिती विचारत आहेत. त्यांना टीम व्हयुवर किंवा एनिडेस्क अॅप डाऊनलोड करायला सांगतात. हे अॅप डाऊनलोड केल्यास आपल्या मोबाईलचा किंवा कॅम्प्युटरचा अॅक्सेस समोरील व्यक्तीकडे जात असून त्यावरुन मोठ्या प्रमाणावर फसवणुक होत आहे. असे मेसेज अथवा फोन आल्यास व कोणतेही अॅप डाऊनलोड करु नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले की, नागरिकांचे मोबाईलवर नोटीफिकेशनचे एसएसएस द्वारे काही बँक मेसेज येतात. त्यामध्ये तुमच्या खात्यावरुन काही ठराविक रक्कम वजा झाली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा असा मजकूर असतो आणि त्याखाली मोबाईल नंबर दिलेला असतो़. नागरिकांनी अशा प्रकारच्या मेसेजला कोणत्याही प्रकारे घाबरुन न जाता पुन्हा उत्तर देऊ नये किंवा त्यातील लिंक शेअर करु नये़ फोनद्वारे व अशा लिंकद्वारे आपल्या फोनचा अॅक्सेस त्यांचे ताब्यात जातो. तुमच्या खात्यावरील पैसे कमी झाल्याचे फोन येत आहेत, असे गेल्या चार ते पाच दिवसात निदर्शनास येत आहे. नागरिकांनी अशा मेसेजला उत्तर देऊ नये अथवा त्यांनी पाठविलेल्या लिंक ओपन करु नये.
अॅप अथवा लिंक ओपन केल्यास आपल्या मोबाईलचा अॅक्सेस सायबर चोरट्याकडे जातो़ व आपल्या फोनमध्ये येणारे ओटीपी, मेसेज, आपले बँकेचे ऑनलाईन अॅप, पेटीएम, गुगल पे यासारखे सर्व अॅप चे अॅक्सेस त्याच्याकडे जातो़ व ते सहजासहजी आपल्या अकाऊंटमधील रक्कम ते काढून घेतात व आपल्यास तात्काळ काही कारवाई करता येऊ नये म्हणून आपल्याला आलेले मेसेजसुद्धा ते डिलिट करतात. सद्यस्थितीत सगळीकडे पेटीएमकडून बोलतो आहे आणि आपली केवायसी अपडेट करायची आहे, असे सांगून लोकांकडून त्यांची माहिती न कळत घेऊन पैसे काढून घ्यायचे अशा प्रकारचा ट्रेंड मागील चार पाच दिवसात दिसून आला आहे. नागरिकांनी अशा प्रकारचे एसएमएस अथवा कॉल आले तर ते घेऊ नयेत अथवा आपल्याबाबतची आणि बँकेची माहिती देऊ नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केले आहे.