पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे सोमवारपासून (दि.२९)विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारापासून मोफत सीएनजी बस सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे विद्यापीठात विविध विभागात कामानिमित्त जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबणार आहे. विद्यापीठातर्फे पहिले तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर मोफत बस सेवा सुरू ठेवली जाणार आहे. त्यानंतर या बसच्या शुल्काबाबत विचार करणार आहे. विद्यापीठाला महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत सीएनजी बसे प्राप्त झाल्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यापीठाच्या आवारात विविध कामांसाठी येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना मोफत सेवा दिली जाणार आहे. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली सीएनजी बसची सेवा सुरू करण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. पांडे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार विद्यापीठात सीएनजी बसचे थांबे निश्चित केले आहे. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत ही बस सेवा उपलब्ध असेल.विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सीएनजी बस पर्यावरण विभागाजवळून भौतिकशास्त्र, जयकर ग्रंथालय व अनिकेत कँटिन येथे थांबेल. त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळून सी-डॅकपासून संगणकशास्त्र विभागाजवळून परीक्षा विभागाजवळ थांबेल. परीक्षा विभागात जाणाऱ्या प्रवशांना सोडून सेट-भवन, आंतराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रापासून मुख्य इमारतीजवळ जावून थांबेल. यानंतर बस विद्यापीठ आवारातील पोस्ट ऑफिस व मुलींच्या वसतीगृहाजवळ थांबून पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ येवून थांबणार आहे. दिवसभर याच मागार्ने बस सेवा सुरू राहिल, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून मोफत बस सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 1:54 PM
विद्यापीठातर्फे पहिले तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर मोफत बस सेवा सुरू ठेवली जाणार आहे.
ठळक मुद्दे तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर मोफत बस सेवा सुरू त्यानंतर बसच्या शुल्काबाबत विचार