पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनानंतर विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे.
विद्यापीठात सीएनजी बससेवा सुरू करण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनुसार ही बससेवा २०१९ या वर्षात सुरू करण्यात आली होती. यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्ससिबिलिटी' अंतर्गत विद्यापीठाला दोन बस उपलब्ध करून दिल्या होत्या. सुरुवातीला तीन महिने मोफत आणि त्यानंतर नाममात्र शुल्क आकारण्याची योजना होती.
तशी ही बससेवा सुरूही झाली मात्र काही काळातच कोरोना आल्यामुळे ही बससेवा बंद करावी लागली होती. मात्र आता विद्यापीठ परिसर पुन्हा एकदा विद्यार्थी व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी फुलला असल्याने कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र - कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एकदा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता एक बस दर अर्ध्या तासाने परिसरात फेऱ्या करत आहे. ही बस विद्यापीठाच्या मुख्य द्वारापासून ते विद्यापीठात असणाऱ्या सर्व मुख्य ठिकाणापर्यंत सेवा देते.
बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची सोय होण्यासोबतच विद्यापीठातील प्रदूषण कमी व्हावे व तेथील अनावश्यक वाहतूक कमी व्हावी यासाठी ही बससेवा आपण सुरू केली आहे. या बससेवेचा सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आवश्यकता भासल्यास आणखीही बस विद्यापीठात सुरू केल्या जातील.- राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ