पुणे: महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत शहरातील तरुण-तरुणींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग (केव्हीआयसी) यांच्या राष्ट्रीय पातळीवर नोडल एजन्सी म्हणून केंद्रीय कुंभारी प्रशिक्षण संस्था नियुक्त करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये आवश्यक ती तरतुद करण्याच्या महिला व बालकल्याण समितीच्या प्रस्तावास गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालकल्याम समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी दिली. याबाबत राजश्री नवले यांनी सांगितले की, प्रधानमंत्री रोजगार अंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग (केव्हीआयसी) याच्या मार्फत राष्ट्रीय पातळीवर नोडल एजन्सी म्हणून केंद्रीय कुंभारी प्रशिक्षण संस्था नियुक्त करण्यात आली आहे. या एजन्सी मार्फत १८ ते ५० वर्षे वयोगटातील सर्वांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. कुंभार उद्योग, पाटी पेन्सील निर्मिती, सरपणापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वस्तू तयार करणे, गुलाल, रांगोळी तयार करणे, रत्न, कटाई, रंग, यार्निश डिस्टेंपर तयार करणे, लाख कागद, खस ताट्या, झाडु, आदी सर्वच प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये अल्प मुदतीच्या १२ दिवसांसाठी २ हजार रुपये तर ३० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी ८ हजार रुपये प्रति प्रशिक्षणार्थी खर्च येणार आहे. एका बॅचमध्ये ५० प्रशिक्षणार्थींना शिकविले जाईल. हे प्रशिक्षण घेतलेल्या तरुण-तरुणींना शहरामध्ये व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी खास साहाय्य करण्यात येणार असल्याचे नवले यांनी सांगितले. महिला व बालकल्याण समितीच्या या प्रस्तावासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये मोठी तरतुद करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील बेरोजगार तरुण-तरुणींना मोठा फायदा होणार असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले.
शहरातील तरुण-तरुणींना मिळणार मोफत व्यावसायिक प्रशिक्षण : स्थायी समितीत प्रस्ताव मंजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:21 PM
महिला व बालकल्याण समितीच्या या प्रस्तावासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये मोठी तरतुद करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे शहरातील बेरोजगार तरुण-तरुणींना मोठा फायदा होणारएका बॅचमध्ये ५० प्रशिक्षणार्थींना शिकविले जाणार