पुणे : देशातील शिधापत्रिकाधारकांसाठी अत्यंत आनंदाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोफत अन्न-धान्य योजनेला मुदतवाढ (डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण २७ लाख ११ हजार १५९ तर पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण १२ लाख ६९ हजार शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. यामध्ये प्रतिव्यक्तीला ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यातील तांदूळ आणि गहू चांगल्या दर्जाचा मिळाला आहे, असे पुणे शहर अन्न-धान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
ढोले म्हणाले, भारतीय अन्न महामंडळाकडून चांगले सहकार्य मिळत आहे. या महिन्यातही रेशनवरील गहू अन् तांदूळ चांगल्या दर्जाचे मिळाले आहेत. पुणे शहरासाठी जवळपास १२ हजार ६०० मेट्रिक टन इतका तांदूळ आणि गहू चालू महिन्यात मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यातील जवळपास ९४.५ टक्के वाटप करण्यात आले.
पुणे तसेच पिंपरी शहरात काही अपंग, आजारी नागरिक आहेत. त्याचबरोबर काहींना वेगवेगळ्या कारणास्तव धान्य घेता येत नाही किंवा प्रत्यक्ष स्वस्त धान्य दुकानांपर्यंत येणे शक्य होत नाही. अशा सर्व नागरिकांना घरपोच धान्य पुरवण्याची व्यवस्था केल्याचे सचिन ढोले यांनी सांगितले.
- जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्वस्त धान्य एकूण दुकाने - १८२३
- पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य एकूण दुकाने - ७२४
- जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण शिधापत्रिकाधारक लाभार्थी - २७,११,१५९
- पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण शिधापत्रिकाधारक लाभार्थी - १२,६९,०००
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या अंतर्गत दोन्ही योजनांचे धान्य भारतीय अन्न-धान्य महामंडळाकडून मिळत आहे. धान्याचा दर्जा चांगला ठेवण्याचा प्रयत्न आहे. लाभार्थ्यांना शंभर टक्के धान्यपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून गहू आणि तांदूळ चांगल्या दर्जाचे आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना खूपच फायदा होत आहे.
- सचिन ढोले, अन्न-धान्य वितरण अधिकारी, पुणे शहर