बारामती : काही दिवसांपूर्वीच वहिनीचा अपघाती मृत्यू झाली. अवघ्या महिन्याभरापूर्वीच पुतण्या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला. या दोन्ही अघातांनी कºहावागज येथील बनकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. हेल्मेटशिवाय प्रवास केल्याने अपघातावेळी घरातील सदस्यांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले, याची जाणीव महामार्ग पोलीस उपनिरीक्षक हनुमंत बनकर यांना होती. त्यामुळे वहिनीच्या तेराव्याच्या दिवशी कºहा वाजग परिसरातील ७० जणांना मोफत हेल्मेट वाटून बनकर कुटुंबियांनी सुरक्षित प्रवासाचा संदेश दिला.
हनुमंत बनकर म्हणाले, रस्ते अपघातामध्ये सर्वांत जास्त बळी डोक्याला झालेल्या गंभीर जखमांमुळे होतात. महामार्ग पोलीस म्हणून काम करीत असताना अशा अनेक अपघातांचा जवळून संबंध आला आहे. हेल्मेटसक्ती अनेकांना जाचक वाटते. परंतु, यामागील उद्देशाचा बारकाईने विचार केल्यास आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट किती आवश्यक गोष्ट आहे, याची जाणीव होईल. आज आमच्या घरात २२ सदस्या आहेत. जानेवारी महिन्यात माझ्या पुतण्याचाही गंभीर अपघात झाला. यात तो जखमी झाला. पहिले पाच दिवस तर तो कोमात होता.काही दिवसांपूर्वी मोरगाव रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये माझा लहान भाऊ गंभीर जखमी झाला तर वहिनीचा मृत्यू झाला. ही वहिनी माझ्यापेक्षा वयाने लहान असली तरी तिला आमची आई म्हणूनच घरात मान होता. मात्र जिवाभावाच माणूस गेल्यावर आपण सुरक्षेविषयीगंभीर होणार आहोत काय?, त्यामुळे इतरांचा तरी प्रवास सुरक्षित व्हावा या उद्देशाने वहिणीच्या तेराव्याला सरपंच मंगल नाळे, नितीन मुलमुले, रामेश्वरी जाधव यांच्या हस्ते हेल्मेट वाटप केले.