पौड : स्वत:च्या जागेचा अभाव, शेतावर मोलमजुरीसाठी सातत्याने होणारे स्थलांतर आणि आधुनिक व्यवस्थेमुळे आदिवासी हा भूमिहीन होऊन त्याला स्वत:चे घर नाही अशी परिस्थिती मुळशी तालुक्यातील आदिवासी समाजाची आहे. भूगाव पासून ताम्हिणीपर्यंत, तर हिंजवडी पासून लवासापर्यंत हा समाज गावकुसाबाहेर दुसऱ्याच्या अथवा शासकीय जागेवर गवतापासून बनवलेल्या झोपडीमध्ये राहतो.
दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाºया या समाजात शिक्षणाचा अभाव, प्रचंड कुपोषण, दारिद्र्य आहे. हिंजवडीसारख्या आयटी हबपासून अवघ्या १२ किमी अंतरावर दारिद्र्याच्या अंधारात चाचपडत असणाºया समाजाला हात दिला आहे एका मोठ्या हृदयाच्या व्यक्तीने, आणि त्या व्यक्तीचे नाव आहे दीपक नथानी. दीपक नथानींच्या मातोश्री पुष्पा नथानी यांनी वर्षभरापूर्वी एका भेटीच्या दरम्यान या लोकांची अवस्था पाहिल्यानंतर या लोकांसाठी घरे बांधून देण्याचा संकल्प मुलगा दीपक याला सांगितला. यावर दीपक नथानी यांनी लगेच आपल्या रेलफोर फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे वर्षभरापूर्वी २६ घरे मुळशी तालुक्यातील आंदेशे या ठिकाणी बांधण्यास सुरुवात केली. याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन व हस्तांतरण समारंभ नुकताच पार पडला. या वेळी दीपक नथानी व त्यांच्या मातोश्री यांच्या हस्ते ९ कुटुंबांना घरांचे हस्तांतरण करण्यात आले.रेलफोर फाउंडेशनतर्फे येत्या वर्षभरात पुणे जिल्ह्यातील आदिवासींना आणखी १०० घरे बांधून देण्याचा संकल्पित प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याची माहिती या कार्यक्रमाच्या वेळी रेलफोर फाउंडेशनचे व्यवस्थापकीय अधिकारी नितीन घोडके यांनी दिली. या वेळी ठेकेदार संतोष कदम, सचिन आकरे, आदिवासी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.