पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ५० शाळांमध्ये शिक्षण मंडळ आणि रूम टू रीड इंडिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सभापती चेतन घुले, संचालक सौरभ बॅनर्जी यांनी दिली.महापालिका शाळांतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे महापालिकेच्या शाळांमध्ये अद्ययावत ग्रंथालये प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहेत. या विषयीचे सादरीकरण महापालिकेत करण्यात आले. या वेळी शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, सदस्य धनंजय भालेकर, विष्णू नेवाळे, श्याम आगरवाल, विजय लोखंडे, चेतन भुजबळ, शिरीष जाधव, फजल शेख, निवृत्ती शिंदे, सविता खुळे, लता ओव्हाळ आदी उपस्थित होते. या विषयी घुले म्हणाले, ‘‘आजचे बालक उद्याचे आशास्थान आहेत. वाचन संस्कार झाल्याने मुले अधिक प्रगल्भ होऊ शकतात. रूम टू रीड इंडिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहराची निवड केली आहे. या उपक्रमाचा सर्व खर्च सेवाभावी संस्था करणार आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने संबंधित संस्थेस जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.’’उपसभापती शिवले म्हणाले, ‘‘ग्रंथालयाच्या धर्तीवर विभागाची सजावट, तीन बुक शेल्फ, चार रीडिंग टेबल, दोन कार्पेट, दोन डिस्प्ले उपलब्ध करून दिले जाणार आहेत. संबंधित ठिकाणी आठशे ते हजार पुस्तके उपलब्ध असणार आहेत. ग्रंथातल्या अक्षरांत आयुष्याला सुबक आकार देण्याचे सामर्थ्य असते. जसे देवघर सात्त्विक भावनांसाठी आवश्यक असते. तसे शाळेमध्ये समृद्ध ग्रंथालय मुलांच्या विकासासाठी आवश्यक असते.’’ (प्रतिनिधी)
महापालिकेच्या ५० शाळांत उभारणार मोफत ग्रंथालय
By admin | Published: March 05, 2016 1:00 AM