पुणे: आम आदमी पक्ष महाराष्ट्र हेल्थ विंगच्या वतीने गृह विलगीकरणात असलेल्या कोव्हीड रुग्णाकरिता मोफत वैद्यकीय सल्ला आणि समुपदेशन यासाठी हेल्पलाइनची (8929207669) सुरुवात करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला अनेक कोव्हीड रुग्ण तसेच त्यांचे कुटुंबीय उपचाराबाबत गोंधळलेल्या आणि भीतीच्या छायेत वावरत आहेत. त्याना डॉक्टरांकडून योग्य वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन देणे. या हेतुने या मोहिमेची सुरुवात करण्यात येत आहे.
ग्रामीण भागामध्ये कोव्हीड साथीमुळे अनेक रुग्ण त्रस्त आहेत. ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सोयी सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. अशा परिस्थितीमध्ये आप हेल्थ विंगने सुरू केलेल्या या नव्या हेल्पलाइनमुळे ग्रामीण जनतेला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असल्याचे आप महाराष्ट्राचे संयोजक रंगा राचुरे यांनी या हेल्पलाइनचे उद्घाटन करताना सांगितले आहे.
या हेल्पलाइनमध्ये २० तज्ञ डॉक्टर्स तसेच १० परिचारिकांचा समावेश असेल. या हेल्पलाइनची आज पासून सुरुवात होत आहे. मुंबई येथील ज्येष्ठ फुप्फुस तज्ञ डॉ. त्रिदिब चटर्जी हे देखील यात आपले योगदान देणार आहेत.