मागील वर्षीच्या कोरोनाने अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. यंदाच्या वर्षी दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या संख्येत अधिकच वाढ होत असताना अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. त्यातच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. अनेक नागरिकांचे रोजगार गेल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. त्यातच सर्वसामान्य कुटुंबातील एखादी व्यक्ती किंवा संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित झाल्यास त्याच्यावर उपचार घेण्यातच रुग्ण व त्याच्या नातेवाइकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मुख्य अडचण निर्माण होत असते ती म्हणजे रुग्ण व नातेवाइकांना जेवणाची. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नारायणगाव येथील भटकंती ट्रेकर्स ग्रुपचे सुदीप कसाबे, महेश वालझाडे, रवी वामन, सोहम वामन, तुषार दिवटे, अमित वालझाडे, प्रणव भुसारी, सुनील इचके, दर्शन वामन, अनिल दिवटे, प्रसाद दळवी, संदीप शिंदे, हेमंत दहितुले, बाळासाहेब दळवी, संजय कसाबे, गणेश दिवटे, सचिन पंडित, रितेश पुजारी, महेश कुतळ, नरेंद्र गोसवी, शेखर दळवी, संदीप दळवी या युवकांनी भटकंती ट्रेकर्स ग्रुपच्या माध्यमातून दि. २८ एप्रिलपासून नारायणगाव परिसरामध्ये असलेल्या कोविड सेंटर हॉस्पिटलमध्ये सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळचे जेवणाचे पॅकिंग डबे विनामूल्य पोहोच करण्याचे काम सुरू केले.
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नारायणगाव पोलीस ठाण्यातील ५० पोलीस कर्मचारी व इतर १११ जसे एकूण १६१ जणांना डबे देण्यात आले. दि. ३ मेला १०६ जणांना डबे देऊन भटकंती ट्रेकर्स ग्रुप अविरतपणे आपली सामाजिक कर्त्यव्यातून सेवा दिली आहे.
याबाबत सुदीप कसाबे, तुषार दिवटे, महेश वालझाडे यांनी सांगितले की, आपणही समाजाचे काही देणेकरी आहोत, म्हणून सामाजिक भावनेतून भटकंती ट्रेकर्स ग्रुप हे सेवेचे कार्य करीत आहे. नारायणगाव परिसराबरोबरच शिरोली बुद्रुक, उंब्रज, वारूळवाडी अशा गावांमध्ये डबे पोहोच करण्याचे कार्य सुरू आहे. ज्या गरजूंना डबे हवे असल्यास त्यांनी ग्रुपशी संपर्क साधावा.
फोटो -