'पुण्याचे पाणी कमी करु नका; महापौरांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडली आग्रही भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 06:11 PM2021-03-26T18:11:08+5:302021-03-26T21:18:55+5:30
कालवा समिती बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळांची आग्रही मागणी.
पुणे : भामा आसखेडचे पुणे शहराला २.६ टीएमसी पाणी नव्याने मिळत असल्याने खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला मिळणारे तितकेच पाणी कमी करावे, या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाला विरोध असून पुणे शहराचे पाणी कमी करु नये, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली.
पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत महापौर मोहोळ यांनी भूमिका मांडली. महापौर मोहोळ म्हणाले, 'पुणे शहराची लोकसंख्या, समाविष्ट गावांच्या पाण्याची गरज आणि भविष्यातील एकूणच गरज लक्षात घेत पुणे शहराची पाणीकपात करणे चुकीची आहे. २००१ साली वार्षिक ११.५० टीएमसी पाण्याचा करार झाला होता. मात्र त्यानंतर पाणी वाढवून द्यावे यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. मात्र निर्णय होऊ शकलेला नाही. त्याउलट पाणीकपात करण्याची पुणेकरांच्या विरोधातील भूमिका जलसंपदा विभागाने घेतली आहे. सद्यस्थितीत पुणे शहराला १८.५ टीएमसीची आवश्यकता आहे.
'पुणे महानगरपालिकेचा गळती कमी करण्याचा प्रयत्न असून २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेमुळे ही पाणीगळती कमी होणार आहे. शिवाय जायका प्रकल्पाच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी सिंचनासाठी वापरता येणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने आपली भूमिका मागे घ्यावी', असेही मोहोळ म्हणाले.
भाजप आमदाराची पाणीकपातीसंदर्भात मागणी; अजित पवार म्हणाले.....
खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा पुरेसा असल्याने योग्य ते नियोजन करून पुणेकरांना पाणीकपातीपासून मुक्त करा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत केली.
यंदा पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तसेच सध्या कोव्हीड साथही जोरात आहे. अशा परिस्थितीत कधीही पाण्याची गरज भासू शकते. त्यामुळे पाणी कपात करू नये असे शिरोळे यांनी सांगितले. तसेच पाणी हा मूलभूत घटक असल्याने यावर वारंवार कामाचा आढावा घेण्याची विनंती शिरोळे यांनी पवार यांना केली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कालवा समितीची बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.