बारामती : बारामती शहरात मागील लॉकडाऊनपासून गरजू लोकांना शिवभोजन थाळी माफक पाच रुपयांना दिली जात आहे. मात्र, सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शासनाने दि.१५ ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्याने याकाळात शहरातील मोलमजुरी करणाऱ्या गरजवंत नागरिकांना शहरातील वेगवेगळ्या भागात ७ केंद्रे उभारली असून, येथे ८५० गरजवंत लोकांना रोज मोफत शिवभोजन थाळी पार्सल दिली जात आहे.
हातावर पोट असणाऱ्या व निराधार नागरिकांसाठी शासनाने शिव भोजन थाळीची शहरात सध्या असणाऱ्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात सात ठिकाणी गरजूंना पार्सल जेवण देण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये बीएसएनएल ऑफिस समोर माता रमाई भवन येथे १५०, दुर्गा टॉकीज समोरील अनंत आशा नगर येथे १००,बारामती एसटी स्टँड उपहारगृहात १५०,इंदापूर रोड वरील मार्केट यार्डात रयत भवन हॉटेल साक्षी मध्ये १५०,जळोची उपबाजार समिती मध्ये १५०, तर माळेगाव मध्ये हॉटेल शिवनेरी येथे १५० लोकांची मोफत पार्सल जेवणाची व्यवस्था केली आहे.
नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणावरून जेवण पार्सल घेऊन जायचे आहे. या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी नागरिकांनी व केंद्रचालकांनी काळजी घ्यावी सध्या शिवभोजन थाळी मोफत असून गराजवंतांनी याचा लाभ घ्यावा
विजय पाटील - तहसीलदार बारामती