लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी व लोकांना त्यांच्या गावांमध्ये अथवा शेतात जाऊन मोफत माती-पाणी परीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यासाठी स्वतंत्र दोन अॅग्रो अॅम्बुलन्स सुरू केल्या आहे. या अॅग्रो अॅम्बुलन्स प्रयोगशाळेचे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण केले. या प्रयोगशाळेमुळे शेतकऱ्यांना माती परीक्षण तसेच पाणी परीक्षण सुविधा उपलब्ध होणार आहेत.
विधानभवन प्रांगणात पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, जुन्नर या ठिकाणी माती व पाणी परीक्षणासाठी नवीन गाडी व आवश्यक उपकरणे उपलब्ध करून दिली. यामध्ये मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या ६ तालुक्यांतील शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या बांधावर अॅग्रो अॅम्बुलन्स नावीन्यपूर्ण उपक्रमाचा फायदा होऊन कीड व रोगांच्या व्यवस्थापन बाबतीत वेळीच अभ्यास करून उपाय करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शास्त्रज्ञांकडे शिफारस करतील व नुकसानकारक कीड ओळख करून दिली जाईल तसेच रासायनिक खतांचा योग्य वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, कीड व रोग यांच्यावर पर्यावरणपूरक उपाययोजना पध्दत सुचवली जाईल. तसेच दरवर्षी मे जूनमध्ये कृषी विधान केंद्रमार्फत जनजागृती कार्यक्रम राबविले जातात. त्यामध्ये या सर्व बाबींचे शेतकऱ्यांना माहिती देऊन योग्य ती खबरदारी घेणार आहे.