धनकवडी : शहरासह उपनगरांमधील तरुणांना कबड्डी खेळाकडे वळविण्यासाठी आणि त्यांनी फिटनेस चांगला ठेवावा यासाठी मोफत प्रशिक्षण सुरू केले आहे. त्याची सुरुवात धनकवडी, मोहननगर येथील लोकनेते स्व. प्रमोदजी महाजन क्रीडांगणात झाली. राजगड कबड्डी ॲकॅडमीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जात आहे.
प्रो-कबड्डी व कबड्डीच्या इतर स्पर्धेच्या वाढत्या स्वरूपामुळे युवा पिढी सध्या कबड्डी खेळाकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे कबड्डी खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, पण या खेळाडूंना पुढे जाण्यासाठी खेळाचा कौशल्य आत्मसात करणं आवश्यक आहे. त्यासाठी गरज आहे ती तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची म्हणूनच नगरसेविका वर्षा तापकीर यांनी प्रभागातील कबड्डीप्रेमींसाठी मोफत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे.
महाराष्ट्रातील, शहरातील खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी प्रशिक्षण मिळते, त्याचप्रमाणे उपनगरांमधील खेळाडूंनासुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देऊन खेळाडू घडवणे हाच आमचा ध्यास असल्याचे छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी मोहिनी देवकर, उद्योजक गणेश भिंताडे, संजय भैलुमे, मारुती शिंदे, विलास कांटे, मुख्य प्रशिक्षक जयंत बोडके, बाळासाहेब वाडकर, रवी शिंदे, केशव कोळकर उपस्थित होते.
------------------
मोहननगर येथे मैदान तयार केले आहे. फिटनेस व कबड्डी प्रशिक्षणासाठी मुलांचा सहभाग वाढावा, सुट्टीच्या कालावधीत मुलांनी मैदानावर रमावे, खेळाची गोडी वाढावी हा हेतू असून प्रशिक्षणासाठी मुलांना खेळाचे लागणारे सर्व साहित्य पुरविले आहे.
- वर्षा तापकीर, नगरसेविका
-------------