पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिल्यावर ते म्हणाले होते, कि अजितदादांना ट्रेनिंग हवे असेल तर मी द्यायला तयार आहे. त्यावर बोलताना अजित पवारांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. मी फडणवीसांना पत्र लिहीणार आहे, की मी तुमच्याकडे प्रशिक्षणाला कधी येऊ, त्यासाठी काही फी लागणार आहे की मोफत ट्रेनिंग देणार असं ते यावेळी म्हणाले आहेत.
गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडून पालकमंत्री जाहीर करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यावरुन अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. फडणवीसांकडे सहा-सहा जिल्हे दिले आहेत. ते कसं पेलवणार आहेत. काय होणार आहे, मला माहिती नाही. मी पुण्याचा पालकमंत्री असताना वेळ देताना नाकीनऊ येत होते. देवेंद्र फडणवीसांनी सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण त्यांना शुभेच्छा, अशा शब्दांत पालकमंत्री नेमणुकीबाबत अजित पवार यांनी विधान केले होतं.
तपासाला इतका वेळ लावायची काहीच गरज नाही
देशात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर सक्त कारवाई झाली पाहिजे. भारतात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देण्याचा कोणालाही अधिकार नाही. जर तसं झालं असेल तर त्यांच्यावर सक्त कारवाई व्हायला पाहिजे की पुन्हा कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे अशा घोषणा देण्याची. पण राज्य सरकार केवळ आमचा तपास सुरु आहे, असं म्हणत आहे. पण तपासाला इतका वेळ लावायची काहीच गरज नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.