पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने ७५ वर्षांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना एसटीने मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा केली होती. पुणे विभागातून या योजनेला शुक्रवार (२६ ऑगस्ट) पासून सुरूवात झाली. तसेच ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठांना आता शिवनेरीसह सर्व बसमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७५ वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने ७५ वर्षांपुढील नागरिकांना एसटीने मोफत प्रवास करता येणार आहे. या योजनेला अमृत ज्येष्ठ नागरिक योजना असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये ७५ पुढील नागरिकांना मोफत तर, ६५ ते ७५ दरम्यानच्या नागरिकांना बस सेवेत ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीसाठी आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना, तहसिलदार यांनी दिलेली ओळखपत्र, एसटीकडून दिली जाणारी स्मार्ट कार्ड, डीजी लॉकर, एम आधार ही ओळखपत्र ग्राह्य धरली जातील. २६ तारखेनंतर प्रवास करणारे पण आधी आरक्षण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना परतावा देखील देण्यात येणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी जवळच्या आगारात, बस स्थानकात परताव्याचा अर्ज पुराव्यानिशी सादर करावा, असे आवाहन एसटीकडून करण्यात आले आहे.